29 जून 2010

ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स(१)

१८९५ च्या नोव्हेंबरमधे लंडन शहराला उदासवाण्या रोगट अशा पिवळ्या धुक्याने वेढून टाकलं होतं. सोमवारी हे धुकं पडलं आणि गुरुवार उजाडला तरी ते नाहीसं होण्याचं काहीच चिन्ह दिसेना. आमच्या बेकर स्ट्रीटवरच्या घराच्या खिडकीतून समोरच्या घरांचे वरचे मजले दिसणं आता अशक्यच आहे असं मला वाटायला लागलं होतं. धुकं पडायला लागल्यावर पहिला दिवसभर होम्स त्याच्या डकवबुकातील नोंदींच्या तपशिलांची खातरजमा करत बसला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा सगळा वेळ त्याने मध्ययुगीन संगीताच्या अभ्यासात घालवला. साहेबांचा हा छंद अगदी अलिकडला होता. तसा होम्सचा स्वभाव अतिशय उमदा आणि सतत काहीतरी करायला तो उत्सुक असे. त्याला थंड बसून राहिलेला मी पाहिला नाही. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी जेंव्हा छपरांना घट्ट बिलगलेलं तेच धुकं आणि त्यातून गळणारे तेलकट पिवळे थेंब त्याने पाहिले तेंव्हा त्याला ते सहन होईना. हातावर हात ठेऊन निरुद्योगीपणे बसून राहण्याबद्दलचा आपला तिटकारा प्रकट करत तो खोलीत येरझाऱ्या घालू लागला. एकीकडे नखं खात एकीकडे आजूबाजूच्या लाकडी वस्तूंवर टकटक करणंही चालू होतं. त्याच्या एकूणच व्यक्तिमत्त्वातून दबली गेलेली आणि बाहेर फुटू पाहणारी ऊर्जा आणि शुद्ध वैताग नुसता निथळत होता.
"वॉटसन, आजच्या वर्तमानपत्रातही काही वाचण्यासारखं नसेल ना?" त्याने मला विचारलं.
'वाचण्यासारखं' म्हणजे गुन्हेगार जगताशी संबंधित काहीतरी हे मला माहीत होतं. आजच्या बातम्यांमधे एक क्रांती, एक होऊ घातलेलं युद्ध आणि एक जवळजवळ निश्चित सत्ताबदल या गोष्टी बरीचशी पानं व्यापून बसल्या होत्या. पण होम्सच्या विश्वात हे सगळं गौण होतं. मी पुन्हा एकदा वर्तमानपत्र चाळलं पण फुटकळ गुह्यांव्यतिरिक्त त्यात विशेष उल्लेखनीय असं खरोखरच काहीही नव्हतं. हताशपणे एक उसासा सोडून त्याने पुन्हा खोलीत फेऱ्या घालायला सुरुवात केली.
"लंडनच्या गुन्हेगारांमधे काही दम नाही राहिला."
तो तक्रारीच्या सुरात म्हणाला. आपल्या लाडक्या खेळातही ज्याचं मन रमू शकत नाहीये अशा एखाद्या खेळाडूसारखा तो दिसत होता.
"वॉटसन, खिडकीतून बाहेर बघ जरा. धुक्याने गिळंकृत केलेल्या वास्तू मधेच दिसल्यासारख्या वाटतात आणि तेवढ्यात परत धुक्यात मिसळून जातात. या असल्या वातावरणात एखादा चोर किंवा खुनी माणूस लंडनमधे कायकाय करू शकेल. एखादा वाघ जसा लपतछपत आपल्या भक्ष्याच्या मागावर जातो आणि क्षणार्धात त्याच्या समोर प्रकट होऊन आपला डाव साधतो आणि पुरता दिसेनासा होतो ना अगदी तसा."
"तश्या बऱ्याचश्या चोऱ्या झाल्या आहेत की" मी म्हणालो.
होम्सने एक तुच्छतादर्शक अस्फुट उद्गार काढत आपली नापसंती व्यक्त केली.
"हे उदास वातावरण आणि रहस्यमय शांतता पाहून असं वाटतंय की लवकरच एखाद्या मोठ्या गोष्टीवरचा पडदा हटणार आहे. या असल्या फुटकळ गोष्टींपेक्षा खूपच मोठी गोष्ट. आणि खरं सांगतो, या समाजाचं नशीब थोर म्हणूनच मी गुन्हेगार नाहीये."
"हे मात्र अगदी खरं आहे" मी म्हणालो.
"जरा विचार कर. मी जर ब्रूक्स किंवा वूडहाऊस किंवा माझ्या जिवावर उठलेल्या इतर छप्पन्न जणांपैकी एक असतो तर मी माझ्या स्वतःच्या पाठलागापुढे असा किती वेळ टिकू शकलो असतो? नुसत्या एखाद्या भेटीच्या खोट्या विनंतीनेच सगळं काम तमाम झालं असतं. ...
अरे वा ! अखेरीस आपल्या एकसुरी कंटाळवाण्या आयुष्यात एक आशेचा किरण डोकावलाच म्हणायचा!"
आमची मोलकरीण एक तार घेऊन आली होती. होम्सने घाईचाईने ती तार फोडली आणि जोरजोरात हसायला सुरुवात केली.
"आता यावर काय बोलणार? मायक्रॉफ्ट येतोय"
"का? काय झालं हसायला?"
"काय झालं? आगगाडी रूळ सोडून नुसत्या रस्त्यावरून चालावी तसं आहे हे. मायक्रॉफ्ट ही आपले रूळ कधीही न सोडणारी गाडी आहे. पॉल मॉल मधलं घर, डायोजेन्स क्लब आणि व्हाईटहॉल ही आपली रूढ चाकोरी सोडून तो फक्त एकदा इथे आलाय. आता असा काय प्रसंग ओढवलाय की त्याला आपला नेम मोडून इथे यावं लागतंय?"
"त्याने काहीच तपशील दिला नाहीये का?"
होम्सने तारेचा कागद माझ्या हातात दिला.

'कडोगन वेस्ट प्रकरणाबाबत तुझ्याशी बोलायचंय. लगेच पोचतोय.
-मायक्रॉफ्ट'

"कडोगन वेस्ट ? मी हे नाव कुठेतरी ऐकलंय"
"मला नाही आठवत हे नाव ऐकल्याचं. पण मायक्रॉफ्ट असा इथे यावा? हे म्हणजे एखाद्या ग्रहाने आपली कक्षा सोडून भरकटावं तसंच झालं. अरे हो! तू ओळखतोस ना मायक्रॉफ्टला*१?"
"हो. मागे एकदा तू मला म्हणाला होतास की तो ब्रिटिश सरकारच्या कुठल्यातरी लहानश्या विभागात काम करतो म्हणून"
होम्स हसला.
"तेंव्हा आपली पुरेशी ओळख व्हायची होती. सरकारी गुपिते माहीत असणाऱ्या माणसाला आपल्या तोंडावर ताबा ठेवावा लागतो. तो सरकारसाठी काम करतो हा तुझा समज खरा आहे पण तुला हे ऐकून कदाचित धक्का बसेल की वेळ पडली तर तो स्वतः सरकार असल्यासारखा काम करतो."
"होम्स!!!"
"मायक्रॉफ्टला वर्षाला साडेचारशे पाऊन्डस मिळतात. तो एका दुय्यम हुद्द्यावर काम पाहतो. त्याला कुठलीही महत्त्वाकांक्षा नाही आणि तो कुठलाही सन्मान किंवा पदवी स्वीकारणार नाही पण या घडीला देशातला तो सर्वात महत्त्वाचा माणूस आहे."
"हे कसं काय?"
"त्याची जागा अजोड आहे. त्याने स्वतःची जागा स्वतः तयार केली आहे. तो ज्या हुद्द्यावर काम करतो तसा हुद्दाच आजवर अस्तित्वात नव्हता आणि यानंतर नसेल. मायक्रॉफ्टचा मेंदू म्हणजे माहितीचं कोठार आहे. कुठलीही माहिती त्याच्या डोक्यात अगदी व्यवस्थित साठवून ठेवली जाते. कोणत्याही माणसाबद्दल उपलब्ध असणाऱ्या सर्व नोंदी तो गरज लागेल तेंव्हा देऊ शकतो. त्याचा आणि माझा मेंदू जवळजवळ सारख्याच पद्धतीने काम करतो. फरक एवढाच की मी गुप्तहेराचं काम अंगावर घेतलं आहे तर तो आपल्या अफाट मेंदूचा वापर सरकारसाठी करतो. कुठल्याही विभाग-प्रभागाचे निर्णय, हिशोब वगैरे त्याला देण्यात येतात आणि एखाद्या केंद्रीय व्यवस्थापन यंत्राप्रमाणे तो सगळ्या तपशिलांचा हिशोब तपासून ताळा करून देतो. या प्रकारचं काम करणारी माणसं त्यांच्या त्यांच्या विभागातली विशेषज्ञ असतात पण मायक्रॉफ्टच्या ज्ञानाला विषयांचं काही बंधनच नाहीये. तो सर्वज्ञ आहे म्हण ना. उदाहरणार्थ, समजा एखाद्या मंत्र्याला नौदल, भारत, कॅनडा आणि धातू-उत्पादन याबद्दल एकत्रित माहिती हवी आहे, तर तो कय करेल? या विषयांशी संबंधित विभागांकडून ती माहिती मागवेल. पण मायक्रॉफ्ट एकटाच बसल्या जागी सगळ्या प्रश्नांचा सगळ्या बाजूंनी विचार करून ठामपणे हे सांगू शकेल की या प्रकारात कोणत्या घटकाचा कोणत्या घटकावर किती परिणाम होईल. आधी त्यांनी सोयीसाठी, वेळ वाचावा म्हणून त्याचा वापर करायला सुरुवात केली. पण आता तो त्यांच्यासाठी गरजेची गोष्ट होऊन बसला आहे. त्याच्या मेंदूत सगळ्या गोष्टी योग्य कप्प्यांमधे ठेवलेल्या असतात आणि त्याला हवी ती गोष्ट क्षणात त्याला सापडते. आजवर शेकडो वेळा त्याने आपल्या राष्ट्रीय धोरणांना योग्य दिशा दिली आहे. मेंदूला खुराक म्हणून तो मोठेमोठे प्रश्न चुटकीसरशी सोडवतो, पण माझ्या एखाद्या प्रश्नाबाबत मी त्याची मदत मागायला गेलो की मात्र तो मान हालवतो.
असा हा मायक्रॉफ्ट आज गुरुवारी, असा अचानक माझ्याकडे का येतो आहे? कोण आहे हा कडोगन वेस्ट? आणि मायक्रॉफ्टला का त्याची एवढी चिंता ?"
"आठवलं!" मी कोचावरचा वर्तमानपत्रांचा पसारा उलटापालटा करत म्हणालो.
"हा बघ. सापडला. परवा मंगळवारी भुयारी रेल्वेमार्गावर एका तरूण माणसाचं प्रेत सापडलं. कडोगन वेस्ट हे त्याचं नाव आहे. "
आपला पाईप तोंडजवळ नेताना अर्ध्यातच होम्स गोठल्यासारखा स्तब्ध झाला.
"हे प्रकरण फारच गंभीर असलं पाहिजे. जर एखाद्या माणसाचा मृत्यू माझ्या भावाला त्याच्या चाकोरीतून खेचून काढत असेल तर तो साधासुधा नक्कीच नसणार. मायक्रॉफ्टचा याच्याशी असा काय संबंध असू शकेल?
मला आठवतंय त्याप्रमाणे तो माणूस बहुधा चालत्या ट्रेनमधून खाली पडून मरण पावला असावा. त्याचं सामान लुटलं गेलेलं नाही आणि त्याला मारहाण झाली आहे असं दाखवणारंही काही तिथे सापडलं नाही. हो ना?"
"या प्रकरणाचा तपास झाला आणि बऱ्याच गॊष्टी पुढे आल्या आहेत. आता ही केस बरीच विचित्र वाटायला लागली आहे."
"माझ्या भावावर झालेला परिणाम पाहता ही भलतीच सनसनाटी केस दिसतेय."
तो त्याच्या खुर्चीत गुरगुटून बसला.
" वॉटसन आपण आपल्याकडे असलेले पुरावे एकदा नीट पाहू या."
"त्या माणसाचं नाव होतं आर्थर कडोगन वेस्ट. तो सत्तावीस वर्षांचा होता. त्याचं लग्न व्हायचं होतं आणि वूलविच शस्त्रागारात तो कारकुनाचं काम करीत असे."
"सरकारी नोकर! इथे मायक्रॉफ्टचा संबंध येतो."
"सोमवारी रात्री अचानक तो वूलविचमधून बाहेर पडला. त्याला शेवटचं पाहिलेली व्यक्ती म्हणजे त्याची होणारी बायको मिस व्हायोलेट वेस्टबरी. सोमवारी संध्याकाळी ७:३० वाजता धुकं पडलेलं असताना तो अचानक तिला सोडून निघून गेला. त्या दोघांच्यात कुठल्याही प्रकारे भांडण वगरे झालेलं नव्हतं. त्याच्या अशा अचानक निघून जाण्यापाठीमागच्या कारणाबद्दल ती काहीही सांगू शकली नाही. मंगळवारी सकाळी मेसन नावाच्या एका रेल्वे कर्मचाऱ्याला त्याचा मृतदेह भुयारी रेल्वेच्या अल्डगेट स्टेशनजवळ सापडला. "
"किती वाजता?"
"मंगळवारी सकाळी सहा वाजता. स्टेशनच्या जवळ, पूर्वेकडे जाताना एक बोगदा लागतो. त्या बोगद्याच्या तोंडापाशी रुळांच्या डाव्या बाजूला त्याचा मृतदेह आडवा पडलेला सापडला. गाडीतून खाली पडल्यामुळे असेल, पण त्याच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. एक गोष्ट मात्र खात्रीने सांगता येईल ती म्हणजे, तो मृतदेह त्या ठिकाणी गाडीतूनच आणला गेला असणार. जर तो शेजारच्या रस्त्यावरून आणला असता तर स्टेशनवरच्या तिकिटं गोळा करणाऱ्या माणसाला चकवून तो आत नेता आला नसता"
"उत्तम. केस तशी पक्की आहे. तो माणूस जिवंतपणी किंवा मृत गाडीतून खाली पडला किंवा त्याला ढकलण्यात आलं. आत्तापर्यंतचा भाग तर सरळ आहे. आता पुढे सांग. "
"ज्या रेल्वेमार्गावरच्या रुळांशेजारी हा मृतदेह सापडला, तो मार्ग पूर्व- पश्चिम जातो आणि त्यावरून धावणाऱ्या गाड्या या पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात. त्या मुख्यतः महानगरातल्याच गाड्या असतात. काही गाड्या विल्सडेन आणि शहराबाहेरच्या इतर जंक्शन्सकडूनही येतात. ज्या वेळी या माणसाचा मृत्यू झाला तेंव्हा तो याच दिशेने येणाऱ्या एखाद्या उशीराच्या गाडीतून प्रवास करत होता हे नक्की. पण तो नेमका कधी या गाडीत चढला हे कळायला काही मार्ग नाही"
"त्याच्याकडे असलेल्या तिकिटावरून ती वेळ कळेल की..."
"त्याच्याकडे तिकीट सापडलेलं नाही."
"काय सांगतोस काय वॉटसन! तिकीट नाही? ही गोष्ट साधी नाही. माझ्या अनुभवाप्रमाणे, तुम्ही तिकीट दाखवल्याशिवाय भुयारी रेल्वेच्या फलाटावर पोहोचूच शकत नाही. म्हणजे या माणसाकडे तिकीट असणार. मग तो कुठून आला त्या स्टेशनचं नाव समजू न देण्यासाठी कोणी ते तिकीट नष्ट केलं का? असू शकेल. किंवा त्याच्या हातून ते पडलं असेल. हेही शक्य आहे. पण यातली सगळ्यात विचित्र गोष्ट कुठली आहे माहितेय? त्याला लुबाडलं गेल्याची कुठलीही खूण नाही."
"हो ना. तशी एकही खूण नाही. ही बघ त्याच्याकडे सापडलेल्या गोष्टींची यादी. त्याच्या पाकिटात दोन पौंड्स आणि पंधरा सेंट्स होते. त्याच्याकडे 'कॅपिटल ऍन्ड काऊन्टीज' बॅंकेच्या वूलविच शाखेचं एक चेक-बुक सापडलं. त्यावरूनच त्याची ओळख पटवली गेली. याशिवाय वूलविच थिएटरच्या पुढच्या रांगेतली त्या संध्याकाळच्या शोची दोन तिकिटं आणि काही तांत्रिक कागदपत्र होती. "
हे ऐकून होम्सने एक समाधानाचा सुस्कारा सोडला.
"वॉटसन, सापडला एकदाचा. ब्रिटिश सरकार ----- वूलविच शस्त्रागार ----- तांत्रिक कागदपत्र ----- माझा भाऊ मायकॉफ्ट या साखळीतला गाळलेला दुवा मला सापडला. आणि हा बघ हा मायक्रॉफ्टच असणार बहुतेक..."
क्षणभरातच मायक्रॉफ्ट खोलीचं दार उघडून आत आला. तो चांगला उंच आणि तगडा होता. त्याच्या विलक्षण शारिरीक ताकदीचा अंदाज चटकन येत होता. पण या सगळ्याहूनही परिणामकारक अशी एक गोष्ट त्याच्याकडे होती ती म्हणजे त्याचा चेहरा. त्याचं मस्तक उन्नत होतं. अतिशय सावध आणि जिवंत असे करडे - खोल डोळे , निग्रही ओठ आणि विलक्षण बोलका चेहरा . त्याच्याकडे एक कटाक्ष टाकताच त्याच्याबद्दलच्या इतर सगळ्या गोष्टी विसरायला होऊन फक्त त्याच्या ताकदवान अशा मनाचीच छाप पक्की उमटत होती. त्याच्या मागोमाग स्कॉटलंड यार्डमधला आमचा जुना सहकारी लेस्ट्रेड आत आला. काहीतरी भयंकर घडलं आहे हे त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली प्रेतकळा पाहून मी ओळखलं. काहीही न बोलता त्याने आमच्याशी हस्तांदोलन केलं. मायक्रॉफ्टने कसाबसा ओव्हरकोट काढला आणि एका खुर्चीत बसकण मारली.
"फारच वैतागवाणा प्रकार आहे हा शेरलॉक. मला माझ्या दिनचर्येत कोणत्याही कारणास्तव बदल करायला आवडत नाही पण परिस्थिती अशी आहे की माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नाही. सयामची सध्याची अवस्था अशी आहे की मी ऑफिसमधून बाहेर पडणं परवडण्यासारखं नाही. पण हे संकट तसं मोठंच आहे. पंतप्रधानांना इतकं चिंताग्रस्त झालेलं मी आजवर पाहिलेलं नाही. तू या केसबद्दल वाचलंच असशील ना?"
"आत्ता आम्ही तेच करत होतो. ती तांत्रिक कागदपत्र कशाबद्दल होती?"
"हम्म तिथंच खरी मेख आहे. अजून ही गोष्ट बाहेर फुटलेली नाही नाहीतर प्रेसवाले आम्हाला सोलून काढतील. त्या माणसाच्या खिशात सापडलेले कागद म्हणजे ब्रूस-पार्टिंग्टन पाणबुडीचे प्लॅन्स आहेत."
मायक्रॉफ्ट खूपच शांतपणे हे सगळं बोलला पण त्यातूनही या प्रकरणाचं गांभीर्य अधोरेखित होत होतं. मी आणि होम्स पुढे ऐकण्यासाठी सरसावून त्याच्याकडे बघत होतो.
"ब्रूस पार्टिंग्टनबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. ही गोष्ट सर्वश्रुतच आहे."
"मी फक्त हे नाव ऐकलंय..."
"तिचं महत्त्व वादातीत आहे. ब्रिटिश सरकारच्या गोपनीय गोष्टींपैकी हे सर्वात मूल्यवान आणि इतर देशांची झोप उडवणारं असं गुपित आहे. या पाणबुडीच्या आसपासच्या कित्येक मैल परिसरात कोणत्याही प्रकारची नाविक हालचाल अशक्य आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी एस्टिमेट्स तर्फे अतिशय मोठी रक्कम चारून या संशोधनाचे सर्वाधिकार मिळवण्यात आलेले आहेत. त्यानंतर ही गोष्ट गुप्त ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले गेले आहेत. या पाणबुडीची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे . तिच्या सुट्या भागांमधे सुमारे तीस वेगवेगळे पेटंटेड भाग आहेत. या सगळ्याम्ची माहिती आणि कागदपत्र आम्ही त्या शस्त्रागाराशेजारच्या एका गुप्त तिजोरीत ठेवलेली होती. या तिजोरीची दारं आणि खिडक्या चोर आणि घुसखोरांना शिरकाव करता येणार नाही अशा प्रकारे घडवलेली आहेत. कुठल्याही परिस्थितीत ते प्लॅन्स त्या तिजोरीतून बाहेर काढायला सक्त मनाई आहे. नौदलाच्या मुख्य रचनाकाराला जरी ती कागदपत्र बघायची असली तरीही त्याला ती वूलविच शस्त्रागारात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने बघावी लागतात. एवढं सगळं असतानाही एका दुय्यम कारकुनाच्या मृतदेहाच्या खिशात लंडनच्या भर मध्यवस्तीत ती कागदपत्र सापडावीत ही गोष्ट कितीतरी धक्कादायक आहे."
"पण तुम्हाला ती परत मिळाली ना?"
"नाही ना शेरलॉक! तीच तर सगळ्यात दु:खाची गोष्ट आहे. वूलविचमधून एकूण १० पानं गायब झाली होती. त्यातली सात पानं कडोगन वेस्टच्या खिशात सापडली. उरलेली तीन पानं सर्वात जास्त मूल्यवान आणि महत्त्वाची होती. त्यांचा काहीच पत्ता लागत नाहीये.
शेरलॉक, तुला हातातली सगळी कामं सोडून यात लक्ष घालायला हवं. तुझे नेहेमीचे पोलिस - कोर्टातले खेळ काही वेळ सोडून दे. कडोगन वेस्टने ते कागद कशासाठी घेतले? उरलेले तीन कागद कुठे आहेत? त्याचा मृत्यू कशामुळे झाला? त्याचा मृतदेह त्या ठिकाणी कसा आला? आणि हा झालेला प्रकार कसा काय निस्तरायचा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस तर तू खूप मोठी देशसेवा केलीस असं म्हणता येईल."
"मायक्रॉफ्ट, तू स्वतःच का नाही सोडवत हे प्रकरण? जे मला दिसतं ते तुलाही दिसतंच की!"
"खरं आहे. पण इथे प्रश्न आहे तो तपशिलांचा. मला यातल्या सगळ्या दुव्यांबद्दल तपशीलवार माहिती दे आणि मी खुर्चीत बसल्याबसल्या तुला सगळं उलगडून दाखवतो. पण माहिती मिळवण्यासाठी धावपळ करा, रेल्वे शिपायांची उलटतपासणी घ्या, जमिनीवर पालथं पडून भिंगातून तपासणी करा, हे मला जमण्यातलं नाही. जर हे कोणी करू शकत असेल तर तो तूच आहेस. ऑनर्स लिस्टच्या पुढच्या अंकात आपलं नाव पाहण्याचं तुझं स्वप्न असेल तर..."
"गुंता सोडवताना मिळणाऱ्या आनंदासाठीच फक्त मी तो सोडवतो . आणि हे प्रकरण निश्चितच रंजक आहे. मला काही गोष्टींबद्दल अजून माहिती हवी आहे."
"तुला उपयोगी पडेल अशी माहिती आणि काही महत्त्वाचे पत्ते मी या कागदावर लिहून ठेवलेत. या कागदपत्रांच्या संरक्षणाची जबाबदारी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मि. जेम्स वॉल्टर्स यांच्यावर आहे. त्यांच्या पदव्या आणि बिरुदावळ्यांची यादी न संपणारी आहे. सरकारी नोकरीत त्यांची हयात गेली आहे. अतिशय सभ्य, कमालीचे लोकप्रिय आणि मुख्य म्हणजे ज्यांची राष्ट्रभक्ती वादातीत आहे असं त्यांच व्यक्तिमत्त्व आहे. ज्या दोन लोकांकडे तिजोरीची किल्ली असते त्यांपैकी ते एक आहेत.
तुला हेही सांगून ठेवतो, की सोमवारी दिवसभर ते कगद सुरक्षितपणे त्या तिजोरीतच होते. सोमवारी दुपारी तीन वाजता सर जेम्स ती किल्ली आपल्या बरोबर घेऊन लंडन शहराच्या बाहेर गेले. जेंव्हा हा सगळा प्रकार घडला त्या दिवशीची संध्याकाळभर ते ऍडमिरल सिन्क्लेअर यांच्या घरी बर्क्ले स्क्वेअरला होते ."
"ही गोष्ट सिद्ध झाली आहे?"
"हो. त्यांचे भाऊ कर्नल व्हॅलेंटाईन वॉल्टर यांनी त्यांच्या वूलविच मधून जाण्याला दुजोरा दिला आहे आणि ऍडमिरल सिन्क्लेअर यांनी त्यांच्या लंडनमधे येण्याला पुष्टी दिली आहे. त्यामुळे ते या प्रकरणातल्या प्रमुख संशयितांमधे मोडत नाहीत."
"ज्याच्याकडे किल्ली होती त्या दुसऱ्या माणसाचं नाव काय?"
"मि. सिडनी जॉन्सन. ते वरिष्ठ कारकून आणि ड्राफ्ट्समन आहेत. ते चाळीस वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांना पाच मुलं आहेत. ते खूप शांत स्वभावाचे आहेत आणि अबोल आहेत. पण आजवरचं त्यांचं रेकॉर्ड अतिशय उत्कृष्ठ आहे. ते अतिशय मेहनती आहेत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं त्यांच्याबद्दल अतिशय चांगलं मत आहे. त्यांच्या जबाबाप्रमाणे ते सोमवारी संध्याकाळी पूर्णवेळ घरीच होते. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी फक्त त्यांच्या पत्नीचाच जबाब उपलब्ध आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती किल्ली त्यांच्या घड्याळाच्या साखळीला अडकवलेली आहे आणि ती तिथून कधीच हाललेली नाही."
" मला कडोगन वेस्टबद्दल माहिती सांग."

--अदिती
(तळटीप १: मायक्रॉफ्ट हा शेरलॉक होम्सचा मोठा भाऊ. खरं म्हणजे शेरलॉक होम्सपेक्षाही जास्त चांगली निरीक्षणशक्ती आणि तर्कबुद्धी त्याच्यापाशी आहे असं स्वतः होम्सचंच मत आहे. पण अंगभूत आळशीपणामुळे आपण तिचा वापर करण्याचं टाळतो असं मायक्रॉफ्टचं म्हणणं आहे...मायक्रॉफ्ट याआधी ग्रीक व्यापाऱ्याच्या गोष्टीत आणि शेवटच्या सामन्यात वाचकांना भेटला आहे.
--अदिती)

1 टिप्पणी: